औरंगाबाद- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील इच्छूक उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना, पक्षादेश दिला तर तुम्ही निवडणूक लढविणार का, असा सवाल पक्षश्रेष्ठींनी केला. त्यावर लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी, 'त्यांना पक्षादेशासोबत धनादेशही द्या!' अशी कोपरखळी मारली. यावर तिथे उपस्थित सर्वच नेत्यांमध्ये खसखस पिकली. असे असले तरी काँग्रेसमध्ये इच्छूकांची गर्दी जास्त झाली तरी पक्षाने तिकीटासोबत निवडणूक लढविण्यासाठी फंड दिला तरच उमेदवार रिंगणात उतरतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.
काँग्रेसच्या
वतीने मराठावड्यातील लोकसभा मतदारसंघाचा नुकताच मुंबईतील टिळक भवन येथे आढावा
घेण्यात आला. मराठवाड्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, पदाधिकारी
आणि आठही लोकसभा मतदारसंघातील इच्छूक उमेदवार यावेळी उपस्थित होते. या बैठकीत
प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी इच्छूक
उमेदवारांची मते जाणून घेत पदाधिकाऱ्यांकडून मतदारसंघाचा आढावा घेतला.
औरंगाबादमधून औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुभाष झांबड, मिलिंद
पाटील यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी तेथे उपस्थित असलेले
फुलंब्रीचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना विचारणा केली. पक्षश्रेष्ठी म्हणाले,
की पक्षाने जर तुम्हाला उमेदवारी दिली तर निवडणूक लढविणार का?
यावेळी आमदार अमित
देशमुखांनी कल्याण काळे यांना पक्ष, आदेशासोबत धनादेश देत असेल तर काळे हे निवडणूक
लढवतील,
असे सांगितले. त्यांच्या
या वाक्याने पक्षश्रेष्ठी आणि तिथे उपस्थित जिल्ह्यातील पदाधिकार्यांमध्ये हशा
पिकला.
कल्याण काळेंनी लढवली होती जालना लोकसभा
कल्याण काळे हे फुलंब्री मतदारसंघातून २००९ मध्ये आमदार म्हणून निवडून आले
होते. यापूर्वी त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती.
पण तेथे त्यांचा निसटता पराभव झाला होता. काळे यांचा
मतदारसंघ जालना लोकसभेत जाणार असल्यामुळे ते स्वत:हून औरंगाबाद लोकसभेची निवडणूक
लढवू इच्छित नाहीत. परंतू पक्षादेशासोबत धनादेश (पार्टी फंड) मिळत असेल तर मात्र
काळे मैदानात उतरु शकतील, अशी चर्चा सुरु आहे. सध्या तरी सुभाष झांबड
यांच्यासाठी पक्षातील पदाधिकारी उत्सुक आहेत असे दिसते.















